बुलडाणा (हॅलो बुलडाणा) प्रभाग ५ ब मधून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले नगरसेवक गजेंद्र शालीग्राम दांदडे हे केवळ नाव नाही, तर शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचा अभेद्य किल्लेदार आहेत. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर जीव देणारी निष्ठा याच्या बळावर त्यांनी बुलढाण्याच्या राजे संभाजी नगरसह संपूर्ण शहरात आपला दबदबा निर्माण केला आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी कधीही पदाचा माज दाखवला नाही, तर कायम जमिनीवर राहून कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केला.
बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवत, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मा. सौ. पुजाताई गायकवाड यांच्या फॉर्म भरण्यापासून प्रचारापर्यंत गजेंद्र दांदडे आघाडीवर होते. स्वतःचा प्रभाग सांभाळत त्यांनी इतर सर्व प्रभागांत फिरून शिवसेनेचा प्रचार केला आणि यशाची खात्री दिली. प्रभाग ५ ब म्हणजे क्रीम प्रभाग हे आमदारांचे विधान त्यांच्या विजयाने खरे ठरवले.
भाजीपाला आडत सांभाळणारा, कुटुंबवत्सल, भावांच्या साथीने साधं जीवन जगणारा गजेंद्र हा देव-धर्म आणि समाजकार्याची सांगड घालणारा नेता आहे. देवीभक्तीपासून बाप्पाच्या भंडाऱ्यापर्यंत, वाढदिवशी गरजूंसाठी गॅस शेगडी, कुकर, भांडी वाटून सामाजिक बांधिलकी जपणारा हा लोकाभिमुख चेहरा आहे. शिक्षण व बांधकाम सभापती असताना त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न धडाक्यात सोडवले.
चार प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष बदलले, परंतु गजेंद्र दांदडे मात्र शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन प्रभागोप्रभाग धावत राहिले. १७०८ मतदारांचे प्रेम खांद्यावर घेऊन त्यांनी स्पष्ट संदेश दिला आहे.शिवसेना म्हणजे सत्ता नव्हे, तर संघर्ष, विकास आणि निष्ठा!











