बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कष्ट, समर्पण आणि जिद्द यांच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीत यश मिळवता येते, हे एका महिलेने सिद्ध केले आहे. दोन मुलांचा आणि संसाराचा गाडा हाकत असतानाच, MPSC परीक्षा मार्फत तिने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची परीक्षा उत्तीर्ण करून एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.त्यांच्या या यशाची कहाणी हजारो महिलांसाठी प्रेरणास्रोत ठरली आहे.
विवाहानंतर घर-कुटुंब हीच प्राथमिकता मानली जात असताना, वैशाली यांनी तिच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न आणि खाकी वर्दीतील नोकरीची महत्त्वाकांक्षा कायम ठेवली. दोन लहान मुलांची काळजी घेणे, घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे आणि त्याच वेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे हे तिच्यासाठी मोठे आव्हान होते.
ही यशस्वी गाथा बुलढाणा जिल्ह्याच्या लाडकी लेक वैशाली गणेश पाटील, ज्या एकेकाळी रोज ४ किलोमीटर पायी शाळेत जात होत्या, आज महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास केवळ प्रेरणादायी नाही, तर खऱ्या अर्थाने “जिद्द, चिकाटी आणि स्वप्नपूर्तीसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचा” एक उत्तम उदाहरण आहे.
वैशाली यांचे १ली ते ४थी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा पिंपळवाडी, ता. चिखली येथे झाले, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव घुबे, ता. चिखली येथे पूर्ण केले. या शाळेत जाण्यासाठी रोज पिंपळवाडी ते देऊळगाव घुबे ४ किमी पायी प्रवास करणे, हे त्यांच्या जीवनातील एक सामान्य दृश्य होते ;पण त्या दृश्यामागे एक असामान्य ध्येय होते.
खो-खो या खेळात वैशाली राष्ट्रीय स्तरावर खेळल्या आहेत आणि त्यांनी रजत पदक पटकावले आहे. ही केवळ खेळातील यश नव्हती, तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीची साक्ष होती. जी पुढे पोलीस सेवेत त्यांना खूप कामी आली.
“पोलीस अधिकारी” बनण्याचा प्रवास. लग्न झाल्यानंतर, दोन मुले आणि घर-संसार सांभाळत असतानाही त्यांनी MPSC ची तयारी सुरू ठेवली. 2020 मध्ये पहिल्या प्रयत्नात अपयश आले, पण त्यांनी हार मानली नाही. दुसऱ्या प्रयत्नात 2021 मध्ये त्यांनी MPSC क्लिअर केली आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली.
दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे त्यांच्या पोलिस उपनिरीक्षक म्हणून खडतर प्रशिक्षणाल सुरुवात झाली होती. २४ डिसेंबर २०२५ रोजी वैशाली यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करीत महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्या या यशाचे श्रेय त्या आपले पती श्री. गणेश गोविंद पाटील आणि आई-वडील आणि माझ्या आयुष्यातील सगळे गुरुवर्य यांना देत.“माझ्या यशामागे माझ्या कुटुंबाचा खूप मोठा सहभाग ,आणि मोलाची साथ आहे,” आम्हा सर्वांच्या एकत्रित
“मेहनत, जिद्द आणि स्वप्नपूर्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचा हा विजय आहे!”असे वैशाली पाटील म्हणाल्या.










