spot_img
spot_img

नांदुऱ्यात हॉटेलच्या मागे चालला होता जीवघेणा खेळ!

नांदुरा (हॅलो बुलडाणा) शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर हॉटेलच्या आडून अवैध डिझेलचा धंदा फोफावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, नांदुरा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल २ लाख ५ हजार रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला आहे. ज्वलनशील डिझेल सदृश पेट्रोलियम पदार्थ बेवारस, असुरक्षित व विनापरवाना साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याने परिसरात भीषण दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता.

दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता तहसीलदार नांदुरा यांच्या सूचनेनंतर पोलिस व महसूल विभागाने संयुक्त कारवाई करत नांदुरा–मलकापूर महामार्गालगत वडनेर भोलजी शिवारात, जम्मू हिमाचल पंजाबी ढाब्याच्या पाठीमागील मोकळ्या शेतात छापा टाकला. येथे बोलेरो पिकअप (MH 28 H 9912) मध्ये तसेच प्लास्टिक टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेलसदृश पदार्थ साठवलेला आढळून आला.

कारवाईदरम्यान १००० लिटर डिझेल, डिस्पेन्सर मशीन, २००० लिटर क्षमतेची टाकी व वाहन असा संपूर्ण मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. इंधनाचे नमुने सील करून रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हा साठा कोणत्याही परवान्याविना, पूर्णतः असुरक्षित अवस्थेत ठेवण्यात आला होता, ज्यामुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण झाला होता.

या प्रकरणी बोलेरो पिकअपच्या चालक/मालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 287, 223 तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!