मेहकर (हॅलो बुलडाणा) समृद्धी महामार्गावर प्राण्यांवरील अमानुषतेचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, म्हैसवर्गीय जनावरांची निर्दयी व बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीवर मेहकर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. तब्बल ३८ म्हशी दाटी-वाटीने कोंबून, जखमी अवस्थेत वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दि. 23 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉर टोलनाक्याजवळ दोन आयशर वाहने संशयास्पदरीत्या थांबवण्यात आल्याची माहिती मेहकर पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार डे ऑफिसर म्हणून कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल जानु पवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
तपासणीदरम्यान MH 20 GZ-3170 व MH 20 EL-9858 या दोन आयशर वाहनांत अनुक्रमे 20 व 18 म्हशी अत्यंत क्रूर पद्धतीने, कोणतीही मोकळी जागा न देता कोंबून भरल्याचे आढळून आले. जनावरे एकमेकांवर चढलेली, जखमी व त्रस्त अवस्थेत असल्याचे स्पष्ट दिसून आले.
या प्रकरणी वाहन चालक अफसर रशीद शेख, अब्दुल वशी अब्दुल अलीम तसेच हेल्पर अब्दुल राजीक अब्दुल खालीद व शेख वसीम अहमद यांना ताब्यात घेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी लहाने मॅडम यांनी केलेल्या तपासणीत अनेक म्हशींना दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले, असून, आरोपींविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11 (1)(d),(e),(l) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










