बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरातील आजचा ऐतिहासिक विजय हा थेट बुलढाणेकरांना अर्पण करत शिवसेनेने राजकीय रणांगणात जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल ४७८० मतांच्या फरकाने शिवसेनेचा दणदणीत विजय झाला असून २२ अधिक २ अशा एकूण २४ जागा बहुमताने शिवसेनेच्या पदरात पडल्या आहेत. हा केवळ विजय नाही, तर विरोधकांसाठी एक जोरदार राजकीय चपराक आहे.
या निकालावर आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “हा विजय अद्भुत, ऐतिहासिक आणि बुलढाण्याच्या राजकारणाची दिशा बदलणारा आहे.जनतेने शिवसेनेवर विश्वास टाकत काँग्रेससह विरोधकांना सपशेल नाकारले आहे,” असे ते म्हणाले.
काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बुलढाण्याचा असूनही त्याचा जिल्ह्यात काहीच प्रभाव पडला नाही.काँग्रेसला फक्त दोनच जागांवर समाधान मानावे लागले, ही वस्तुस्थिती आहे.“महाराष्ट्रभर डिंगा मारणाऱ्या प्रदेशाध्यक्षाचा बुलढाण्यात पूर्णपणे फज्जा उडाला आहे.आता नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे,”असा घणाघात आमदार गायकवाड यांनी केला.ते पुढे म्हणाले,“हर्षवर्धन सपकाळ जिल्ह्याच्या पदावर राहण्याच्याही लायकीचा नाही. त्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलेच पाहिजे.”
बुलढाण्यातील हा निकाल म्हणजे शिवसेनेच्या ताकदीचा आणि जनतेच्या रोषाचा स्पष्ट संदेश आहे.











