बुलढाणा (हॅलो बुलडाणा) १६ डिसेंबर डोंगरशेवली येथील होतकरू, हुशार आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या ऋतुजा गणेश सावळे (वय १९) हिचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून गेला आहे. एका निष्पाप विद्यार्थिनीचे उज्ज्वल भविष्य रस्त्यावरच संपुष्टात आल्याने हळहळ व्यक्त केली जात असून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहतूक अराजकतेवर संताप व्यक्त होत आहे.
ऋतुजा ही राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय, बुलढाणा येथे प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. आई-वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तिने अथक परिश्रम घेतले होते. तिचे वडील गणेश सावळे यांनी तर मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी परदेशात शिक्षण देण्याची तयारीही ठेवली होती. अखेर तिला आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.
आज १६ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ऋतुजा बजाज चेतक दुचाकीवर कॉलेजकडे निघाली होती. गावापासून काही अंतरावरच बसच्या बाजूने जात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने तिला जोरदार धडक दिली. धडकेमुळे तोल जाऊन ऋतुजाचे डोके थेट बसला आदळले आणि ती रस्त्यावर कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत तिला जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.या घटनेमुळे डोंगरशेवली गावासह संपूर्ण महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातप्रवण रस्ते, बेशिस्त वाहतूक आणि प्रशासनाची उदासीनता यामुळेच एका निष्पाप जीवाचा बळी गेला, अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. ऋतुजा एमबीबीएससाठीही पात्र ठरली होती, अशी माहिती समोर येत असून डॉक्टर होण्याचे स्वप्न अपघातात संपल्याने सर्वत्र आक्रोश उमटत आहे.












