सुनगाव (हॅलो बुलढाणा) शेतात घाम गाळणाऱ्या एका कष्टकरी तरुण शेतकऱ्याचा विषारी सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सुनगाव येथे घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मनोहर मारोती वंडाळे (वय ३८) हे काल दि. १५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास आपल्या शेतात गहू पिकाला पाणी देत असताना अचानक विषारी सापाने त्यांच्या पायाला दंश केला. क्षणात आनंदी संसारावर काळाचा घाव बसला.
सर्पदंश होताच शेतात उपस्थित नातेवाईकांनी वेळ न दवडता मनोहर वंडाळे यांना उपचारासाठी जळगाव जामोद येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे त्या रुग्णालयात सर्पदंशावरील अत्यावश्यक अँटी-स्नेक व्हेनम लस उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्णाला पुढील उपचारासाठी खामगाव येथे रेफर करण्यात आले. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेच्या या गंभीर निष्काळजीपणाचा फटका थेट एका निष्पाप शेतकऱ्याच्या जीवावर बसला.
जळगाव जामोद ते खामगाव या धावपळीत वेळ निघून गेला आणि खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मनोहर वंडाळे यांना मृत घोषित केले. उपचार मिळाले असते तर जीव वाचू शकला असता, अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू असून आरोग्य विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.रात्री उशिरा सूनगाव येथे मनोहर वंडाळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा व मुलगी असा मोठा आप्त परिवार आहे. कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून सुनगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे










