बुलढाणा (हॅलो बुलडाणा) रांची झारखंड येथे १८ ते २५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या १४ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संजीवन स्कूलची विद्यार्थिनी श्रेया श्रीकांत भाग्यवंत हिची निवड झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात अभिमानाची लाट उसळली आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या श्रेयाने जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर थेट राष्ट्रीय पातळीवर मजल मारत “बुलढाण्याच्या लेकींनाही कोणी रोखू शकत नाही” हे सिद्ध करून दाखवले आहे.
अमरावती व नाशिक येथे २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान झालेल्या राज्यस्तरीय निवड स्पर्धांमध्ये मुंबई, पुणे, नगर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर व कोल्हापूर अशा आठ विभागांतील खेळाडूंमधून श्रेयाची निवड झाली. या स्पर्धेत कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व संजीवन स्कूल करत होते. मूळ बुलढाण्याची असलेली श्रेया या निवडीत झळकली आणि संपूर्ण जिल्ह्याचा मान उंचावला.
मुलांप्रमाणेच मुलींनाही संधी दिल्यास त्या इतिहास घडवतात, हे श्रेयाने ठणकावून सांगितले आहे. या यशामागे संजीवन अध्यक्ष पी. आर. भोसले, सचिव एन. आर. भोसले, सौरभ भोसले, क्रीडा शिक्षक जयंत कुलकर्णी, सागर पाटील व फुटबॉल प्रशिक्षक अमित साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे.या ऐतिहासिक निवडीबद्दल भाग्यवंत कुटुंबासह समस्त बुलढाणावासीयांकडून श्रेयाचे जोरदार अभिनंदन होत आहे.










