लोणार (हॅलो बुलडाणा) जगप्रसिद्ध आणि ५२ हजार वर्षांपूर्वी उल्कापातातून निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर आज गंभीर संकटात सापडले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड वाढत असून, यामुळे ऐतिहासिक व धार्मिक वारशावर मोठा धोका निर्माण झाला आहे. कधीही पाण्याखाली न गेलेले सरोवरातील कमळजा देवीचे प्राचीन मंदिर तब्बल १५ फूट पाण्याखाली गेले असून, ही घटना अत्यंत चिंताजनक आहे.
लोणार सरोवरात मागील काळात मासे आढळल्याने वैज्ञानिक जगतात खळबळ उडाली होती. खाऱ्या व क्षारीय पाण्याच्या या सरोवरात मासे कसे टिकतात? पाण्याची पातळी अचानक कुठून आणि कशामुळे वाढते आहे? या मूलभूत प्रश्नांची उत्तरे आजही अनुत्तरित आहेत. देश-विदेशातून शास्त्रज्ञ, संशोधक आणि पर्यटक लोणारला भेट देतात, मात्र इतक्या गंभीर बदलांकडे संबंधित प्रशासन आणि पुरातत्व विभागाने डोळेझाक केली आहे.
सरोवराच्या चारही बाजूंनी असलेली हेमाडपंथी मंदिरे, जैवविविधता आणि जागतिक वारशाचा दर्जा असलेले हे सरोवर हळूहळू धोक्यात येत असताना, शासन मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत आहे. तात्काळ सखोल वैज्ञानिक संशोधन, पाण्याच्या स्त्रोतांचा शोध आणि संरक्षणात्मक उपाययोजना न केल्यास लोणार सरोवराचा अनमोल वारसा कायमचा नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.










