spot_img
spot_img

ग्रामसेवक कुठे? रायपूर ग्रामपंचायतीत अराजक; मूलभूत सेवा कोलमडल्या! प्रशासन अजून किती दिवस डोळेझाक करणार? रायपूरकरांचा संतप्त सवाल

रायपूर (हॅलो बुलडाणा/ सचिन जयस्वाल) ग्रामपंचायतीतील प्रशासनाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, गेल्या महिनाभरापासून नियमित ग्रामसेवक गैरहजर असल्याने संपूर्ण ग्रामपंचायत अक्षरशः ठप्प झाली आहे. या बेजबाबदारपणाचा फटका थेट सर्वसामान्य ग्रामस्थांना बसत असून, अखेर संतप्त नागरिकांनी आज सकाळी ग्रामपंचायतीसमोर जोरदार आंदोलन छेडले.

ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे जन्म-मृत्यू नोंदणी, विविध दाखले, करआकारणी, घरकुल योजना, जलपुरवठा, शौचालय योजना तसेच विकासकामांच्या फाईली धुळखात पडल्या आहेत. नागरिकांना वारंवार पंचायत कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असल्या तरी एकही काम मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांचा संयम सुटत चालला आहे.

प्रशासनाकडून केवळ तात्पुरत्या स्वरूपात ग्रामसेवक पाठवून जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. हे तात्पुरते ग्रामसेवक गावात वास्तव्यास नसल्याने प्रत्यक्ष कामकाज होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. तात्पुरता ग्रामसेवक नको, गावात कार्यरत आणि काम करणारे गणेश पाहेघन यांनाच कायम नियुक्त करा,अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनस्थळी विस्तार अधिकारी अरविंद टेकाळे व गवते यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत ‘बीडीओ कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे’ असे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनांवर आता विश्वास राहिलेला नाही, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला.

जर तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमण्यात आला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा देत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले. ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प होऊन संपूर्ण गावातील मूलभूत सेवा विस्कळीत झाल्या असताना, प्रशासन अजून किती दिवस डोळेझाक करणार? असा संतप्त सवाल आता रायपूरकर विचारत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!