खामगाव (हॅलो बुलडाणा) आजही अनेक शाळांमध्ये गणित म्हणजे भीती, सूत्रे म्हणजे डोकेदुखी आणि उत्तर तपासण्यासाठी गुरुजींची वाट पाहणे हीच जुनी पद्धत सुरू आहे. मात्र कदमापूर (ता. खामगाव) येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेने ही साखळी तोडली आहे. येथील उपक्रमशील शिक्षक राजेश कोगदे यांनी अवघ्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना दहा ते पंधरा सेकंदात गुणाकार, भागाकार, बेरीज-वजाबाकीची स्वतः पडताळणी करण्याचे कौशल्य दिले आहे. परिणामी विद्यार्थी आता गुरुजींवर अवलंबून नाहीत ते स्वतःच ‘गणित गुरु’ बनले आहेत
संगणकाच्या युगात केवळ शिकवणे नव्हे, तर शिकायला शिकवणे महत्त्वाचे असते हे तत्व प्रत्यक्षात उतरवण्याचे काम कोगदे यांनी केले आहे. पूर्वी भाजक × भागाकार + बाकी या पारंपरिक पडताळणीवर अडकलेले गणित, आता सोप्या आणि झटपट तंत्रामुळे विद्यार्थ्यांसाठी खेळ झाले आहे. कितीही मोठा गुणाकार असो उत्तर बरोबर की चूक, हे विद्यार्थी क्षणात ठरवतात.
हा केवळ प्रयोग नाही, तर शिक्षण पद्धतीवरचा थेट सवाल आहे. ज्या शाळांमध्ये गणित भीतीदायक आहे, त्यांनी कदमापूरकडे पाहावे राजेश कोगदे यांनी यापूर्वीही गणित, भाषा व इंग्रजीसाठी सुलभ अध्ययन पद्धती विकसित केल्या आहेत.











