सिंदखेड राजा (हॅलो बुलडाणा) राहेरी बुद्रुक येथील रहिवासी व भारतीय सैन्यात कार्यरत असलेले प्रमोद सुरेश गवई सुट्टीवर घरी आले होते. पत्नी सौ. कोमल गवई आणि लहान मुलासह आनंदाने सासरवाडी लोणारकडे निघाले होते. मात्र नियतीने या प्रवासाला थेट मृत्यूकडे वळवले. समोर चालणाऱ्या अज्ञात बैलगाडीला दुचाकीचा अचानक धक्का लागला. पत्नी कोमल रस्त्यावर कोसळल्या आणि त्याच क्षणी जालन्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले. जवानाच्या डोळ्यांसमोर पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
प्रमोद गवई आणि त्यांचा चिमुकला मुलगा थोडक्यात बचावले असले, तरी पत्नीच्या मृत्यूचे भयावह दृश्य आयुष्यभर त्यांच्या मनावर कोरले गेले आहे. घटनास्थळी जमलेले नागरिक हादरले, डोळ्यांत अश्रू तर मनात संताप होता. ट्रक चालक फरार झाला.किनगाव राजा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सिंदखेड राजा येथे पाठवला या शोकांतिकेने संपूर्ण पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे.










