बुलढाणा (हॅलो बुलडाणा) देवाचा दुसरा अवतार मानले जाणारे डॉक्टरच ‘भक्षक’ बनल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा शहरात उघड झाला आहे. घाटाखालच्या परिसरातील केवळ ११ वर्षीय निरागस बालकाला डोळ्याच्या छोट्याशा ऑपरेशनसाठी नातेवाईकांनी बुलढाणा शहरातील एका नामांकित नेत्ररुग्णालयात आणले होते. हसत-खेळत आलेला हा चिमुकला काही तासांतच मृत्यू पावेल, याची कल्पनाही कुटुंबीयांना नव्हती.
ऑपरेशनची भीती वाटू लागल्याने बालकाने नकार दिला. मात्र ऑपरेशन करायचेच ठरवलेल्या ‘भक्षक डॉक्टराने’ त्याला जोरजबरदस्तीने बेशुद्धीचे इंजेक्शन देत शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली. सूत्रांच्या माहितीनुसार, दिलेल्या हाय डोज इंजेक्शनमुळेच बालकाचा तिथल्या तिथे मृत्यू झाला. चुकीचा डोस, क्षणात हरवलेले प्राण… आणि जबाबदारीपासून पळवाट काढण्यासाठी सुरू झाला “तेरी भी चुप… मेरी भी चुप” चा घृणास्पद खेळ!
प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून त्या भक्षक डॉक्टराने बालकाला मृतावस्थेतच शहरातील मोठ्या, राजकीय आश्रय असलेल्या हॉस्पिटलमध्ये ‘रेफर’ केले. धडधडत्या हृदयाने नातेवाईकांनी तिथे धाव घेतली; पण तिथेही राजकीय आश्रय मिळालेल्या डॉक्टरांनी मृतदेहाला ‘भरती’ दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे.
निर्दोष बालकाचा मृत्यू… जबाबदारीची गळाच नाही… आणि मेडिकल माफियांचा उघडपणे सुरू असलेला व्यवस्थेवरचा काळाकुट्ट प्रभाव! या संपूर्ण घटनेने बुलढाण्यात तीव्र संताप उसळला आहे. जबाबदार डॉक्टरांवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे. अशा हयगयीचे राक्षसी प्रकार रोखायचे असतील, तर समाजाने पुढे येऊन या भक्षक डॉक्टरांना त्यांच्या जागेवर बसवणे अत्यावश्यक ठरते…!










