देऊळगाव राजा (हॅलो बुलडाणा/ संतोष जाधव)शहरातील जाफराबाद रोडवर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात मजुरीसाठी आलेल्या दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जणी गंभीर जखमी झाल्या. रोजीरोटीच्या शोधात परराज्यातून आलेल्या या महिलांवर अक्षरशः काळाने झडप घातली.
मिळालेल्या माहितीनुसार, परराज्य आणि अमरावती जिल्ह्यातून कापूस वेचण्यासाठी आलेल्या काही महिला सकाळच्या सुमारास पिंपळगाव येथे जाण्यासाठी मालवाहू पिकअप (MH 38 E 2082) मध्ये बसत होत्या. तेवढ्यात मागून येणाऱ्या एस.टी. बसने (MH 20 BL 2276) भरधाव वेगात पिकअपला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दोन महिलांचा मृतदेह चुराडा झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या भीषण अपघातात ठार झालेल्यांमध्ये मायाबाई सुरज काजले (३२, राह. रामखेरा, बुऱ्हानपूर) आणि रिचाय काल्या कासदेकर (७२, राह. नांदुरी, धारणी, अमरावती) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये सुहाना प्रतिराम इपने (१६), खुशबू बबलू पालवी (१७), सुलोचना सहारे (३५), पुरुषाने इपने (२२) आणि नर्मदा सोनू इपने (४५) यांचा समावेश असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर जालना येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच डॉ. अक्षय गुठ्ठे, चालक सुभाष कणखर आणि समाधान आघाव यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिस निरीक्षक ब्रह्मागिरी यांनीही तातडीने पथकासह घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. देऊळगाव राजा पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.कामाच्या शोधात आलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांवर या अपघाताने दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.










