बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एकीकडे बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड यांनी ओपन स्पेस गैरव्यवहार धाडसाने उघड करून नगरपरिषदांच्या गैरव्यवस्थेत खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या परखड वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत असताना,त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातील महसूल आणि आरोग्य विभागात मात्र भ्रष्टाचाराचे महाभारत सुरूच आहे. जनसामान्यांना सर्वाधिक फटका बसत असलेल्या या भ्रष्टाचाराकडे त्यांनीही लक्ष देणे अत्यंत आवश्यक झाले आहे.महसूल विभागात तत्कालीन मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांचा अबाधित दादागिरीपूर्ण भ्रष्टाचार आजही सुरू असून, त्यांच्यावर शेकडो कोटींच्या बेकायदेशीर संपत्ती जमवण्याचा आरोप आहे.
जमीन फेरफार, तुकडेबंदी,सातबारा,न्यायालयीन आदेशांची पायमल्ली…अशा शेकडो प्रकरणांचे ठोस पुरावे प्रसार माध्यमांनी जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,लाचलुचपत विभाग,महसूल आयुक्तांपर्यंत पोहोचवले; तरीही कारवाई शून्य! उलट डी-ओपन असतानाही टेकाळेंची पदोन्नती हा महसूल विभागातील निर्लज्ज भ्रष्टाचाराचा कळस आहे.आरोग्य विभागातही परिस्थिती तितकीच भीषण आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील वादग्रस्त बडतर्फ भांडारपाल प्रकाश बोथे याच्या करोडो रुपयांच्या बेकायदेशीर संपत्तीविषयी ऑगस्ट 2024 मध्येच चौकशी व जप्तीची शिफारस झाली असूनही डिसेंबर 2025 पर्यंत आरोग्य विभाग आणि आरोग्यमंत्र्यांकडून दिरंगाईच सुरू आहे.भ्रष्टाचाराला शून्य सहिष्णुता घोषित करणाऱ्या राज्यातच बुलढाण्यात भ्रष्ट अधिकारी उन्मत्तपणे काम करतात, ही जनतेला टोचणारी बाब आहे.
आ.संजुभाऊ यांनी आता हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न लावून महसूल व आरोग्य विभागातील या राकट भ्रष्टाचाराकडेही लक्ष घालून ठोस पावले उचलावीत, व दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी जनतेची ठाम मागणी आहे.
क्रमशः











