spot_img
spot_img

विहिरीत सापडलेल्या कारचे गूढ उकलले! सीसीटीव्हीने उघड केला भीषण कट – दांपत्याचा मृत्यू अपघात नव्हे, अज्ञात वाहनचालकाची बेफिकीरी कारणीभूत

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) तेलंगणाहून जळगावकडे लग्नसमारंभासाठी निघालेलं पाटील दाम्पत्य बेपत्ता झाल्याने निर्माण झालेलं गूढ अखेर उकललं आहे. काही दिवसांच्या शोधमोहिमेनंतर वडनेर भोलजी शिवारातील राष्ट्रीय महामार्गालगतच्या विहिरीत कारसह दोघांचेही मृतदेह आढळले. या प्रकरणामागे घातपाताचा संशय व्यक्त होत असतानाच सीसीटीव्ही फुटेजमुळे हादरवून टाकणारी वस्तुस्थिती समोर आली आहे.

घटनास्थळाजवळील हॉटेल विश्व गंगा येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनाने पाटील दांपत्याच्या कारला जबरदस्त कट मारला. या कटमुळे कार अनियंत्रित झाली आणि थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. हा अपघात इतका भीषण होता की कार क्रेनद्वारे बाहेर काढल्यानंतर आत दोघांचेही मृतदेह आढळले.

तेलंगणातील सिमेंट कंपनीत कार्यरत पद्मसिंह दामू पाटील आणि पत्नी नम्रता हे एमएच 13 बीएन 8583 क्रमांकाच्या कारने पाचोरा येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी जात असताना अचानक बेपत्ता झाले होते. त्यांचे शेवटचे लोकेशन वडनेर परिसरात आढळत होते. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर नांदुरा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली.

सीसीटीव्ही फुटेजमधील पुराव्यावरून अज्ञात वाहनचालकाची बेफिकीरीच या भीषण मृत्यूला कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने १० डिसेंबर रोजी त्याच्याविरुद्ध कलम 281, 106 बीएनएस तसेच कलम 119, 134 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फिर्याद मृत पद्मसिंह पाटील यांचे चुलत भाऊ संदीप रमेश पाटील यांनी दिली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.पोलिस तपासामुळे या दुर्दैवी घटनेचे रहस्य उलगडले असले तरी निष्पाप दांपत्याचा जीव घेणाऱ्या अज्ञात वाहनचालकाचा शोध लागणे हीच आता मोठी जबाबदारी ठरली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!