जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा) जळगाव जामोद एसटी बस आगाराचा कारभार अक्षरशः भगवान भरोसे! मागील अनेक महिन्यांपासून आगार परिसर पथदिव्यांच्या अंधारात बुडाला असून रात्री प्रवाशांना भीषण परिस्थितीतून जावे लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांना संधी, महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह आणि परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने संपूर्ण आगार निर्जन बनले आहे. इतकी गंभीर परिस्थिती असताना आगार व्यवस्थापक पवन टाले मात्र गाढ झोपेत असल्याची भावना प्रवाश्यांमध्ये तीव्र आहे.
बस स्थानकातील असंख्य सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. अनेक एसटी बसेस फलकाविना धावत असल्याने प्रवासी कोणती बस कुठे जाणार यासाठी अडखळत फिरतात. चौकशी कक्षातील लाऊडस्पीकर बंद परिणामी अनाउन्समेंट नाही आणि प्रवाशांची प्रचंड तारांबळ. सुलभ शौचालयांचा तर बोजवारा उडाला आहे; घाणीचे साम्राज्य, नळांना पाणी नाही आणि बेसिन नादुरुस्त. ‘प्रवाशी सेवा’ ही संकल्पना इथे मृत्युपंथाला गेली आहे.
आगारातील बस दुरुस्ती आणि देखभाल वेळेवर न झाल्याने गाड्या रस्त्यात बंद पडणे ही रोजचीच घटना बनली आहे. वेळेवर बस न सुटल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांवर खचाखच गर्दी. तर सुनगाव, जामोद, आसलगाव, खांडवी मार्गावरील बसेस सतत उशिरा किंवा रिकाम्या धावत असून लोकांच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. अनेक वाहकांकडून प्रवाशांशी गैरवर्तन होत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
या सर्व गोंधळामागे आगार व्यवस्थापक पवन टाले यांच्या नियोजनशून्य आणि निष्काळजी कारभाराला प्रवासी वर्ग जबाबदार धरत आहे. वेळेवर लक्ष न दिल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आगारातील अराजकतेवर लगाम घालावा, अशी प्रवाशांची आक्रमक मागणी आहे.











