spot_img
spot_img

गाजलेल्या ‘हेराफेरी’ची अमरावतीत रिपीट परफॉर्मन्स! खामगावच्या दलालासह पाच जणांचा कोटींचा ‘डबल पैसे’ घोटाळा उघड

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या ‘हेराफेरी’ चित्रपटात दाखवलेला डबल पैसे चा डाव प्रत्यक्षात अमरावतीत घडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १५ दिवसांत ४०% नफा देतो, असे आमिष दाखवून एका प्राध्यापकाची तब्बल १ कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून या प्रकरणात खामगावचा दलाल संतोष सातपुते महत्त्वाचा दुवा ठरला आहे. पोलिसांनी सातपुतेला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

तक्रारदार प्राध्यापक विजय केशवराव टोपे (वय ५२, अंबापेठ) यांची ओळख खामगावच्या संतोष सातपुतेमार्फत नागपूरमधील चार आरोपींशी झाली. प्रशांत नायडू (कामठी), महेश वरघडे (मानेवाडा), अनिल (नागपूर) आणि या रॅकेटचा सूत्रधार विजय बघेल (रायपूर) यांनी एका बनावट प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट फर्मच्या नावाखाली गुंतवणूक घेतली. १५ दिवसांत रक्कम डबल करण्याचे आमिष दाखवून टोपे सर आणि त्यांच्या आठ परिचितांकडून एकूण ₹१ कोटी रोख उकळले.

नागपूरमध्ये बनावट ऑफिस उघडून आरोपींनी विश्वास निर्माण केला. मात्र पैसे मिळताच सर्वांनी कार्यालयाचा गाशा गुंडाळला आणि गायब झाले. ठरलेल्या तारखेला ना पैसे, ना आरोपी फक्त बंद दरवाजा! प्रकार लक्षात येताच प्राध्यापक टोपे यांनी सदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

खामगावचा संतोष सातपुते हा लोकांना गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यासाठी मुख्य फ्रंटमन म्हणून काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या अटकेनंतर रॅकेटचे धागेदोरे पोलिसांच्या हाती येऊ लागले आहेत. तर मुख्य सूत्रधार विजय बघेल छत्तीसगडमध्ये फरार असून त्याच्या शोधासाठी नागपूर पोलिसांनी रायपूर पोलिसांशी संपर्क साधला आहे.या टोळीने आणखी किती जणांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे, याचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणामुळे खामगाव व अमरावती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!