बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात अवैध गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध आज (दि. ८ डिसेंबर २०२५) पोलिसांनी मोठी मोहीम राबवत धडाकेबाज कारवाई केली. मा. पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या उपस्थितीत बुलढाणा शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि आरसीपी पथकांच्या पाच विशेष टीम यासाठी तयार करण्यात आल्या.
शहरातील विविध भागांत अचानक धाडी टाकून पानटपरी, दुकाने आणि संशयित ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात अवैधरीत्या गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ आणि दारू विक्री करणाऱ्या ३३ गुटखा विक्रेत्यांवर व ५ दारू विक्रेत्यांवर असा एकूण ३८ जणांवर कारवाई करण्यात आली. सर्वांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की तंबाखूचे सेवन टाळावे आणि कुठेही अवैध विक्री होत असल्याचे आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. शहरातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी अशा कारवाया सुरूच राहणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.











