बुलडाणा (हॅलो बुलडाणा) राजे संभाजी नगरातील जागृत श्री दत्त मंदीर परिसर आज दत्तमयरंगात न्हाऊन निघाला. श्री संत गंगामाई स्थापित या पावन स्थळी अखंड आठ दिवस चाललेल्या श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाची शनिवारी (दि. ६ डिसेंबर) महाप्रसादाने भव्य सांगता झाली. सकाळपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. भक्तिभाव, उत्साह आणि धार्मिक रंगांनी भारलेले वातावरण भाविकांना आनंदित करत होते.
(दि. २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर) या कालावधीत पारायण सप्ताहांत अभिषेक, सत्यदत्त पूजा, सप्तशक्ती पाठ, नामस्मरण, आरत्या, तसेच विविध भजनी मंडळांची भजन-कीर्तनांची मैफिल रंगली. श्रीराम-जानकी महिला भजनी मंडळ, सुयोग भजनी मंडळ, श्री गजानन महिला मंडळ यांच्या भक्तिगीतांनी वातावरण अधिक पवित्र झाले. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
४ डिसेंबर रोजी सराफा लाईन येथील श्री गणपती मंदिराची काकड आरती सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरली. हभप अनंत महाराज चिंचोळकर यांच्या प्रवचनांनी भाविकांना अध्यात्मिक उर्जा दिली. त्यानंतर झालेल्या पालखी मिरवणुकीने शहरात दत्तजयजयकार घुमवला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत काला-किर्तन आणि मिरवणुका उत्साहात पार पडल्या.
शनिवारी पारायण सप्ताहाच्या सांगतेनिमित्त वरण-भात, पोळी, भाजी आणि गोड शिरा अशा महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाविकांची रांग अखंड चालूच होती. दर्शन व महाप्रसादासाठी झालेल्या उत्स्फूर्त गर्दीने यंदाचा उत्सव अधिक भव्य ठरला.सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री दत्त मंदिर ट्रस्ट आणि समस्त दत्त भक्तगणांनी परिश्रम घेतले. भक्तिभाव, शिस्तबद्ध व्यवस्था आणि दिव्य धार्मिक वातावरणामुळे यंदाची दत्त जयंती बुलडाण्यात लक्षवेधी ठरली.














