चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) चिखली-जालना मार्गावर गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात होऊन मेहकरचे सुप्रसिद्ध आणि तरुण डॉक्टर ऋषीकांत रमेश काटे (वय ३६) यांचा मृत्यू झाला आहे. अचानक रस्त्यावर धावून आलेल्या कुत्र्याला वाचविताना त्यांची महिंद्रा एक्सयूव्ही 700 गाडी डिव्हायडर ओलांडून रस्त्याच्या खाली पलटी झाल्याची माहिती मिळाली आहे.
डॉ. काटे हे मेहकर येथील ‘ऋषीकृपा सोनोग्राफी सेंटर’चे संचालक असून, ते हॉस्पिटलच्या परवान्याच्या नुतनीकरणासाठी कंपाउंडर वैभव जाधव यांच्यासह बुलढाणा येथे गेले होते. दुपारी 4.15 च्या सुमारास बुलढाण्यावरून परतताना वैभवला दरेगावात सोडण्यासाठी त्यांनी चिखलीमार्गे जालना रोड पकडला. सायंकाळी सुमारे 5.15 वाजता जागृती चहा सेंटरजवळील वळणावर डिव्हायडरमधून अचानक कुत्रा येताच त्यांनी गाडी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याखाली घसरत जाऊन भीषणपणे पलटी झाली.
अपघात इतका जबरदस्त होता की एक्सयूव्ही 700 च्या समोरच्या, मागच्या आणि बाजूंच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. स्थानिक नागरिकांनी दोघांना बाहेर काढून तातडीने अॅम्बुलन्सद्वारे जावंजाळ हॉस्पिटल, चिखली येथे दाखल केले. मात्र डॉ. काटे यांना गंभीर डोके व छातीच्या दुखापतीमुळे उपचारापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. वैभव जाधव हा किरकोळ जखमी झाला आहे. पोलीस तपास सुरू असून अचानक आलेल्या कुत्र्यामुळे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरुण व लोकप्रिय डॉक्टराचा मृत्यू मेहकर आणि परिसरासाठी मोठा धक्का ठरला आहे.














