बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शहरात पोलिसांच्या वर्दळीचा परिसर… त्यातही पोलिस वसाहत! पण तरीही चोरांनी पाच घरांचा दरवाजा फोडत तब्बल वीस लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही अभूतपूर्व चोरी 6 डिसेंबर रोजी चिखली रोडवरील देवी मंदिराशेजारील पोलिस वसाहतीत घडली असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक कामानिमित्त अनेक पोलिसांची ड्युटी बाहेर लागली होती. त्याच संधीचा अचूक अंदाज घेत चोरट्यांनी वसाहतीत मुक्तसंचार करत एएसआय वारे, पोलिस कॉन्स्टेबल रुबीना पटेल यांच्यासह इतरांच्या घरांत हात साफ केला. घरांमधून रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिने असा लाखोंचा ऐवज चोरट्यांनी आरामात उचलला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पोलिस अधीक्षक कार्यालय आणि ग्रामीण पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसाहतीत ही चोरी झाली.घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांसह फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.














