बुलढाणा (हॅलो बुलडाणा) नगरपालिका निवडणुकीत वाढलेल्या गैरव्यवहारांच्या संशयाने परिसरात तापलेली राजकीय हवा आणखी तीव्र झाली आहे. ईव्हीएममध्ये बंदिस्त झालेल्या बुलढाणेकरांच्या मतांच्या सुरक्षेसाठी आज ५ डिसेंबर रात्री १०.३० वाजेपासून स्ट्रॉंग रूमसमोर उमेदवार प्रतिनिधीने मुक्कामी ठिय्या सुरू केला आहे. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरलेल्या सौ. उर्मिलाताई सतीशचंद्र रोठे पाटील यांच्या वतीने हा पहारा दिला जात असून, २० डिसेंबरपर्यंत ईव्हीएम सुरक्षा सुनिश्चित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
“बुलढाणेकरांच्या आशा, आकांक्षा या मशीनमध्ये सीलबंद आहेत. या स्वप्नांना तडा जाऊ नये यासाठीच हा संघर्ष,” असा ठाम पवित्रा आंदोलकांनी व्यक्त केला आहे. बुलढाण्यातील बेकायदेशीर प्रभाग रचना, त्रुटीपूर्ण बूथ रचना आणि भरीव चुका असलेली मतदार यादी यावर गेल्या काही महिन्यांपासून आंदोलने पेटली होती. जनतेपासून ते न्यायालयापर्यंत हा लढा नेला, परंतु २ डिसेंबरला घडलेल्या बोगस मतदानाच्या धक्कादायक प्रकारामुळे परिस्थिती गंभीर बनली.
बोगस मतदारांना प्रत्यक्ष मतदान करताना पकडण्यात आल्यानंतर निवडणूक प्रक्रियेवरील प्रश्नचिन्ह अधिकच गडद झालं. “ही केवळ निवडणूक नाही, तर बुलढाणेकरांच्या विश्वासाचा प्रश्न आहे,” असे म्हणत बोगस मतदान रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एसआयटी चौकशीची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
आंदोलकांच्या मते, प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने आता लोकशाही रक्षणासाठी प्रत्यक्ष स्ट्रॉंग रूमच्या दारात बसून पहारा देण्याची वेळ आली आहे. “आझाद हिंदचा कार्यकर्ता म्हणून मतदानाच्या सर्वोच्च अधिकाराचे रक्षण करणारच,” अशी आक्रमक भूमिका जाहीर करण्यात आली असून, बुलढाणा नगरपरिषदेतील हा संघर्ष आणखी भडकण्याची चिन्हे दिसत आहेत.














