बुलडाणा (हॅलो बुलडाणा) दत्तभक्तांसाठी पर्वणी ठरलेल्या राऊतवाडी केंद्रातील ‘श्री गुरुचरित्र’ सप्ताह पारायण सोहळ्याची आज (5 डिसेंबर) भव्यदिव्य सांगता झाली. मार्गशीर्ष महिन्यातील अष्टमीदिनी (28 नोव्हेंबर) सुरू झालेल्या या सामूहिक वाचनात तब्बल 490 स्वामी सेवेकरी सहभागी झाले, हीच या सोहळ्याची मोठी ताकद ठरली.
सात दिवस संपूर्ण राऊतवाडी दत्तनामाच्या अखंड जयघोषाने आणि अध्यात्मिक ऊर्जेने भारून गेले. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत भक्तांची अखंड गर्दी राहिली. महिलांपासून ज्येष्ठांपर्यंत आणि युवकांपासून बालकांपर्यंत – सर्वांनी एकसुरात ‘श्री गुरुचरित्र’ पठण करत परिसरात भक्तिरस ओतप्रोत भरला.
या वर्षी पारायणाचा उत्साह अक्षरशः अभूतपूर्व होता. केवळ राऊतवाडीच नव्हे तर शहरभरातून, तसेच शहराबाहेरील गावांमधूनही सेवेकरी मोठ्या संख्येने येऊन सहभागी झाले. सामूहिक पारायणाचा परिणाम म्हणून संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण, भक्तीभाव आणि सामाजिक एकोपा निर्माण झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.5 डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता महापूजेनंतर करण्यात आली. त्यानंतर आयोजित महाप्रसादाला प्रचंड गर्दी उसळली. हजारो भाविकांनी भक्तिपूर्वक प्रसादाचा लाभ घेतला. व्यवस्थापनाने उत्तम नियोजन करून संपूर्ण सोहळा सुरळीत व अनुशासित पद्धतीने पार पाडला.














