चिखली (हॅलो बुलडाणा) महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांनी डी.पी. रोड परिसरात आज घेतलेल्या आक्रमक दौऱ्याने संपूर्ण व्यापारीवर्गाला नवचैतन्य मिळाले आहे. दुकानदार, हातगाडीधारक, फळ-भाजी विक्रेते, छोटे उद्योजक यांच्याशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. व्यापाऱ्यांनीही आपला विश्वास खुल्या शब्दांत व्यक्त करत “काशिनाथ आप्पा आमच्या हक्काचा न्याय देणारच!”— अशी ठाम भूमिका घेतली.
दौऱ्यात व्यापाऱ्यांनी रस्त्यावरची अनियंत्रित वाहतूक, अस्ताव्यस्त पार्किंग, दिवसरात्र चालणारी धूळधाण आणि स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधले. “ग्राहकांना पार्किंग मिळत नाही, सततची धूळ व्यवसायावर थेट परिणाम करते,” अशी तक्रार अनेकांनी मांडली. हातगाडी, भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांनी सुरक्षित, नीटनेटकी आणि ग्राहकाभिमुख जागेची मागणी ठामपणे समोर ठेवली. “जागा मिळाली तर रोजचा व्यवसाय दुप्पट होईल,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
काशिनाथ आप्पांनी प्रत्येक समस्या बारकाईने ऐकून घेत शहरातील व्यापार वाढणे, रोजगार वाढणे आणि व्यापाऱ्यांना सन्मानाने काम करता यावे, ही माझी प्राथमिक जबाबदारी असेल असे आश्वासन दिले. त्यांच्या साध्या, मनमोकळ्या संवादशैलीने व्यापारीवर्ग पूर्णपणे भारावून गेला.
डी.पी. रोड परिसरातील व्यवसाय, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी ठोस पावले उचलण्याचे संकेत देत काशिनाथ आप्पांचा आजचा दौरा अत्यंत प्रभावी ठरला.














