बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दत्ता शंकर काकस यांनी माध्यमांसमोर आक्रमक भूमिका घेत बुलढाणा शहरातील भ्रष्टाचार आणि भीतीचे वातावरण संपवण्याचा संकल्प जाहीर केला. सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातून आलेल्या दत्ता काकस यांनी आपल्या पत्नी सौ. लक्ष्मी दत्ता काकस यांच्यावतीने नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांकडे थेट संवाद साधत बुलढाणा बदलणारच असा दमदार नारा दिला.
शहरातील जन्ममृत्यू नोंदीपासून ते पुरवठा विभाग, बांधकाम परवानग्या ते विविध युनिट्स या सर्व विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या विळख्यातून शहराला मुक्त करण्याची जबाबदारी मी स्वतःवर घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नगरपालिकेत जाणारा प्रत्येक सामान्य नागरिक अडथळ्याविना, भीतीविना आणि लाच मागण्याच्या अनुभवाशिवाय आपले काम करून घेऊ शकेल हेच माझे ध्येय आहे, असे ते म्हणाले.
शहरातील तयार करण्यात आलेल्या भीतीच्या वातावरणावरही त्यांनी जोरदार टीका केली. एका विशिष्ट व्यक्तीच्या विरोधात बोलू नका, मत मांडू नका… असे वातावरण बुलढाण्यात निर्माण केले आहे. ही भीती मी मोडून काढणार. लोकांनी निर्भयपणे आपले मत व्यक्त केलेच पाहिजे, आणि ते व्यासपीठ मी देणार, असा ठाम इशारा त्यांनी दिला.माझ्या कुटुंबातील कोणीही व माझ्यासोबत असलेली कोणतीही व्यक्ती ठेकेदार होणार नाही. ही भ्रष्ट व्यवस्था मुळापासून उखडून टाकणार, असे काकस यांनी जाहीरपणे सांगत मोठ्या नेत्यांवर अंधविश्वास ठेवण्याऐवजी एक सर्वसामान्य माणसावर विश्वास ठेवण्याची नागरिकांना विनंती केली.














