जानेफळ (हॅलो बुलडाणा/अनिल राठोड)
जानेफळ पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा (LCB) बुलढाणा यांनी संयुक्तपणे धडाकेबाज कारवाई करत अवघ्या 48 तासांत मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांना गाठले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यातील एकाला जेरबंद केले असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि रोख रक्कमही हस्तगत केली आहे. दुसरा आरोपी फरार असून त्याच्या मागावर पोलिसांचे पथक तुफान गतीने काम करत आहे.
मोहना खुर्द येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात 23 नोव्हेंबरच्या मध्यरात्री दानपेटी फोडून 10 ते 15 हजारांची रक्कम लंपास झाली होती. मंदिराचे अध्यक्ष सुरेश रमेश जवंजाळ यांनी तत्काळ तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलीस अधीक्षक मा. श्री. निलेश तांबे (IPS), अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. संतोष खाडे आणि पोलीस निरीक्षक मा. श्री. अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहिम वेगाने सुरू झाली.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा फडशा पाडला. विठ्ठल रमेश बंगाळे (23, रा. किनी गोडमोड) याला पकडून त्याच्याकडून ह्युंडाई एक्सेंट कार (MH 04 GM 3890) आणि 2,300 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. मात्र आरोपी शुभम गौतम शिखरे हा अजूनही फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके जंगल, गाव, हद्द ओलांडून शोधमोहीम राबवत आहेत.
यासोबतच नायगाव दत्तपूर येथील स्टेट बँक चोरीच्या प्रयत्नाचाही धागा मिळत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या संपूर्ण कारवाईत सपोनी अजिनाथ मोरे, पोउनी प्रताप बाजड, पोउनी संतोष जाधव, हेड कॉन्स्टेबल अमोल शेजोल, शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, राजेंद्र अंभोरे, रमेश नायडू, मोहन सावंत, कॉन्स्टेबल विशाल धोंडगे व माधव काळे यांनी निर्णायक भूमिका बजावली.














