बुलडाणा (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील मुख्य शहरापासून केवळ 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरखंडाळा येथील तब्बल 14 एकर शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीने आता जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडवली आहे. तारे परिवाराने प्रशासनाकडे दिलेल्या तक्रारीनंतर समोर आलेली माहिती ही केवळ धक्कादायकच नाही तर सत्ता, पैसा, जमीन दलाली आणि प्रशासकीय संगनमताची स्पष्ट झलक दाखवणारी ठरत आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जमीन खरेदीची प्रक्रिया नियमबाह्य, अपारदर्शक आणि दबावाखाली राबविली गेली. या व्यवहारामागे प्रभावी राजकीय व्यक्ती, स्थानिक सत्ताधारी गट आणि काही महसूल यंत्रणेमधील अधिकाऱ्यांचा थेट अथवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शेतजमिनीची सामाईक मालकी, वारस नोंद, जमीन हस्तांतरण, परवानग्या, मोजणी, विषय नोंदी या सर्व टप्प्यांवर कथितरीत्या हस्तक्षेप झाल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे नियमांचा भंग करून व्यवहार नियमित करण्याचा प्रयत्न छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदार महेंद्र राऊत करीत असल्याचा आरोपही चर्चेत आहे.
स्थानिक नागरीक आणि शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे “जमिनीच्या नावावर भांडवलदारांचे राजकारण, अधिकाऱ्यांचे मौन आणि दलालांची लूटखोरी आम्ही सहन करणार नाही!” हे प्रकरण केवळ एका खरेदीचा मुद्दा राहिलेला नसून संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या जमीन दांडगाई आणि प्रशासनिक आशीर्वादाचा चेहरा उघडा पाडणारे ठरत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी, संबंधित अधिकारी व राजकीय हस्तक्षेपकर्त्यांची जबाबदारी निश्चिती, व्यवहार त्वरित स्थगिती आणि न्याय मिळविण्याची मागणी आता जोर धरत आहे. जनक्षोभ वाढत असल्याने महसूल यंत्रणा आणि प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
क्रमशः…














