मेहकर (हॅलो बुलडाणा/गजानन राऊत) तालुक्यातील मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा मातीमोल करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक धम्मसागर कांबळे हे मद्यधुंद अवस्थेतच शाळेत येऊन विद्यार्थ्यांसमोर अक्षरशः राडा घालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रार्थना सुरू असताना, सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित असतानाच कांबळे यांनी नशेत संतुलन गमावत केलेल्या वागणुकीने पालक व ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक दारूच्या नशेत शाळेच्या आवारातच अडखळत फिरणे, आवाज उठवणे, विद्यार्थ्यांसमोर अयोग्य वर्तन करणे असे गंभीर प्रकार घडले. यादरम्यान विद्यार्थ्यांची सकाळची प्रार्थना सुरू होती आणि शिक्षक स्तब्ध उभे राहून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत होते. या संपूर्ण घटनेचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.
ग्रामस्थांनी जोरदार निषेध नोंदवत जिल्हा परिषद व शिक्षण विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. शाळेतील मुलांच्या डोळ्यासमोर असे कृत्य करणारा शिक्षक नव्हे, तर शिक्षणाचा अपमान करणारा गुन्हेगार आहे, अशा शब्दांत पालकांनी संताप व्यक्त केला. मुख्याध्यापक कांबळे यांच्यावर तत्काळ निलंबनाची व विभागीय चौकशीची मागणीही करण्यात आली आहे.
या घटनेने संपूर्ण मेहकर तालुक्यात चर्चा सुरू असून, शिक्षण विभाग या शर्मनाक घटनेवर कोणती कडक कारवाई करणार? हा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शिक्षणाच्या पावित्र्यासाठी कठोर निर्णय घेण्याची आता सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे.














