चिखली (हॅलो बुलडाणा/सय्यद साहिल) चिखली – साखरखेर्डा रोडवर आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास सवळद फाट्यावर भीषण अपघात झाला. देळगांवमाळी येथील गणेश विश्वनाथ मठे (वय 30) आपल्या दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की गणेश मठे जागीच गंभीर जखमी झाले. दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला; पण धडक देणारे वाहन मात्र पसार झाले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने गणेश मठे यांना तातडीने चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही काल सायंकाळी सुमारास ७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या अचानक झालेल्या मृत्यूने देळगांव माळी परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.अपघातानंतर मृतदेह पीएमसाठी उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे पाठवण्यात आला असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.










