डोंगरखंडाळा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र भर गाजत असलेल्या डोंगरखंडाळा येथील 14 एकर जमीन व्यवहाराने आता नवे वादंग पेटवले आहे. तारे परिवाराने प्रशासनाकडे नियमबाह्य खरेदीबाबत साकडे घातल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशयास्पद व्यवहारामागे एका प्रभावी राजकीय किंगमेकरचा आणि काही शासकीय अधिकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे गंभीर आरोप आता चव्हाट्यावर आले आहेत.
ग्रामस्थ व भूमिगत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार महेंद्र राऊत यांच्या नावाने झालेली 14 एकर जमीन खरेदी ही केवळ कागदोपत्री नाही, तर विशेष ‘लक्ष्मी दर्शन’ घेऊन झालेली असल्याची चर्चा गावोगावी रंगू लागली आहे. अविभक्त जमिनीचा हिस्सा काढताना इतर सहमालकांना नोटीस न देणे, स्वतंत्र सातबारा न काढणे, सर्च रिपोर्ट न घेणे, कर्जमुक्तीच्या प्रक्रिया लपविणे या सर्व गंभीर त्रुटी असूनही व्यवहार विजेच्या वेगाने कसा झाला? हा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे.
याहून खळबळजनक म्हणजे, तारे परिवाराच्या मालकीच्या 28 एकर संयुक्त शेतीपैकी 14 एकर जमीन एका बाहेरील “त्या” इसमास , आणि तेही वादग्रस्त परिस्थितीत, कोणाच्या आदेशावर देण्यात आली? गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, साधा शेतकरी अशी गुंतागुंतीची जमीन कधीही घेत नाही, म्हणजेच हा व्यवहार ‘रिस्क’ नसून ‘पाठबळावर’ झाल्याचा संशय अधिक गडद होत आहे.या सर्व माहितीचा अभ्यास करण्यासाठी विधीतज्ञ आता दस्तऐवजांचे बारकाईने विश्लेषण करत आहेत. तारे परिवाराने सत्यासह न्याय मिळवण्यासाठी लढा छेडला असून, प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता दोषींवर कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
या घोटाळ्यामागील खरे चेहरे कोण? कोणाच्या आदेशावर 14 एकर शेती गिळंकृत झाली?
जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही… ‘हॅलो बुलडाणा’चे पोलखोल सत्र असंच सुरू राहील!
क्रमशः














