बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बुलढाणा शहरात एक धक्कादायक चित्र समोर आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनाची मुदत 10 नोव्हेंबरपासून सुरू असूनही आजपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही! शहराच्या भविष्याचा कणा मानल्या जाणाऱ्या या पदासाठी अशी ‘शून्यता’ दिसणे राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे ठरत आहे.
याउलट नगरसेवक पदासाठी मात्र प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून 90 अर्ज बुलढाणा नगरपालिकेकडे पोहोचले आहेत.त्यामुळे तळागाळात निवडणुकीची चुरस वाढली असली, तरी पहिल्या नागरिकाच्या खुर्चीकडे मात्र सर्वच संभाव्य दावेदारांचे पाय मागे का? हा प्रश्न शहरात चर्चेचा विषय झाला आहे.
उद्याचा दिवस म्हणजे 17 नोव्हेंबर 2025, नामनिर्देशनाची अंतिम मुदत. त्यामुळे विविध गट-तटांचे राजकारण, गठबंधने, उमेदवार ठरवण्याचे पडद्यामागील व्यवहार रात्री उशिरापर्यंत रंगणार हे निश्चित. अनेक दिग्गज नेते उद्याच दमछाक करत अर्ज दाखल करण्यासाठी धाव घेणार अशी दाट शक्यता आहे. शेवटच्या दिवशी ‘शो ऑफ स्ट्रेंथ’ करीत मोठमोठे मोटार ताफे आणि समर्थकांच्या आरोळ्या अशी प्रचंड गडबड दिसेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंतची शांतता ही वादळापूर्वीची शांतता ठरणार का? की शहराला एखादा अनपेक्षित चेहरा नेतृत्व देणार? याचा फैसला आता उद्याच होणार आहे.














