चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) शहरात वाढत्या अपघातांना चाप लावण्यासाठी चिखली पोलिसांनी शनिवारी धडक मोहीम राबवत बेशिस्त टिपर चालकांची कंबरडे मोडली. पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या आदेशावरून खामगाव चौफुली, सिद्ध सायन चौक आणि मेहकर फाटा परिसरात मोठी नाकाबंदी उभारण्यात आली. शहरात भरधाव वेगाने, विनानंबर आणि कागदपत्रांशिवाय धावणाऱ्या टिपरचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले होते. आजच्या कारवाईने मात्र त्यांना थेट लगाम बसला.
पोलीसांनी MH 28 AB 7129, MH 28 BV 8809, MH 28 AB 7509 आणि MH 28 BB 1200 या चार टिपरवर कारवाई करत चालकांना ताब्यात घेतले. निष्काळजी ड्रायव्हिंग, इतरांच्या जिवास धोका, नंबर प्लेट नसणे आणि कागदपत्रांचा अभाव या गंभीर गुन्ह्यांखाली भारतीय न्याय संहिता कलम 281 तसेच मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्व वाहने तत्काळ जप्त करून पोलीस स्टेशन परिसरात उभी करण्यात आली.
पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. ठाणेदार भुषण गावंडे यांनी स्पष्ट इशारा दिला की पुढील काळात फॅन्सी नंबर प्लेट, मॉडिफाईड सायलेंसर, विनानंबर व भरधाव वाहनधारकांवर आणखी कठोर कारवाई करण्यात येईल.














