बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सायबर गुन्हेगारांचे जाळे मोडीत काढत बुलडाणा सायबर पोलिसांनी आणखी एक भलामोठी कामगिरी बजावली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ नावाने नागरिकांना धडकी भरवून लाखो रुपये लुटणाऱ्या फसवणूक रॅकेटला बुलडाण्यातील तपास पथकाने मोठा तडा दिला आहे. तक्रारदार विनोदकुमार साळोक आणि त्यांच्या पत्नीला सीबीआय व ट्राय विभागाच्या नावाने धमक्या देत तब्बल १० लाख रुपये उकळले होते. मात्र पोलिसांच्या वेगवान तपासाने गुन्हेगारांचा डाव उघडकीस आणत तब्बल ९ लाख ९४ हजार ३०० रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत.
२० ते २४ ऑगस्टदरम्यान व्हॉट्सअॅप कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत फसवणूक केली गेली होती. तक्रार नोंदताच पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी वेळ न दवडता विविध बँक खात्यांतील व्यवहारांची तांत्रिक तपासणी सुरु केली. पैसे अनेक खात्यांतून फिरवून शुक्रवारी मिझोरममधील एका खात्यात पोहोचल्याचे स्पष्ट झाले. त्वरित कारवाई करून खाते गोठवण्यात आले आणि न्यायालयाच्या आदेशानुसार १२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात परत जमा करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगर, तपास अधिकारी संग्राम पाटील, प्रमोद इंगळे, रामेश्वर मुंढे, प्रशांत गावंडे, राहुल इंगळे आणि केशव पुढे यांच्या पथकाने अत्यंत कौशल्याने केली. या धडाकेबाज तपासामुळे फसवणूक रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
एसपी निलेश तांबे यांनी नागरिकांना इशारा देत स्पष्ट केले की, ‘डिजिटल अरेस्ट’ असा कोणताही कायदेशीर प्रकार नसतो. पोलीस कधीही व्हॉट्सअॅप कॉलवरून अटक करत नाहीत. अनोळखी व्हिडिओ कॉलला प्रतिसाद देऊ नये. फसवणूक झाल्यास १९३० / १९४५ या क्रमांकावर किंवा सायबर पोलीस स्टेशनमध्ये त्वरित संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.














