बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांना दिलासा देणारा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आता उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्गांनी अर्ज सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजीदेखील अर्ज स्वीकारले जाणार असून, यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ऑनलाईन प्रणालीमध्ये सतत तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन आणि अर्ज अपलोड करताना येणाऱ्या समस्यांमुळे उमेदवारांच्या तक्रारी वाढत होत्या. या तक्रारींची दखल घेत आयोगाने तातडीने निर्णय घेत नवीन शुद्धीपत्रक जाहीर केले आहे. आता उमेदवारी अर्ज प्रक्रियेतील गोंधळ, विलंब व अडथळे दूर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या अचानक निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, हा निर्णय नेमका कोणाच्या दबावामुळे घेण्यात आला? असा प्रश्नही समोर येत आहे. उमेदवारांना दिलासा मिळत असला तरी प्रशासनाची तयारी, मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधा यांची मोठी चाचणी होणार हे निश्चित.














