चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) तालुक्यातील काँग्रेस पक्षाला हादरा देणारी धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सत्येंद्र भुसारी (वय 55) यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. मुंबईहून चिखलीकडे परतताना कसारा घाटात चालत्या रेल्वेतून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. तत्काळ नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भुसारी हे चिखली तालुक्यातील भोरसी येथील रहिवासी असून सध्या गांधी नगर चिखली येथे वास्तव्यास होते. त्यांच्या अकस्मात निधनाने काँग्रेसमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून चिखली शहरात शोककळा पसरली आहे. दीर्घकाळ पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्थानिक राजकारणात आपली छाप पाडली होती.त्यांच्या निधनामुळे चिखली तालुक्यातील काँग्रेसला मोठी पोकळी निर्माण झाली असून अनेक कार्यकर्त्यांनी सामाजिक माध्यमांवर श्रद्धांजली वाहिली आहे. सत्येंद्र भुसारी यांचा स्नेह, कार्यनिष्ठा आणि साधेपणा यांची चिखलीकरांना आठवण कायम राहील.














