बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एकेकाळी शिंदे गटात सामील झाल्यानंतर चर्चेत आलेले अनंता शिंदे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. आज सकाळी बुलढाणा शहरातील संगम चौक येथे असलेल्या ‘एएसएस क्रिएशन’ या कार्यालयात नोकरीच्या निमित्ताने आलेल्या तीन महिलांसोबत गैरवर्तन झाल्याची तक्रार बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, महिलांनी नोकरीविषयी चौकशी केली असता, संचालक अनंता शिंदे यांनी “विविध प्रोडक्ट विकावे, आणि नोकरी हवी असेल तर एकट्याने यावे” अशा अयोग्य स्वरूपाच्या मागण्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे महिलांमध्ये संताप उसळला आणि घटनास्थळीच शाब्दिक वाद तसेच शिवीगाळ झाली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करत अनंता शिंदे यांच्यावर विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
अनंता शिंदे हे तब्बल 2 ते 3 वर्षे विविध पदांवर सक्रिय राहिले असून, त्यांनी आपल्या वडिलांच्या “देशसेवेचा वारसा” जोपासत असल्याचा दावा केला होता. मात्र, आता त्यांच्यावर झालेल्या या गंभीर गुन्ह्यामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.शहरात या घटनेची प्रचंड चर्चा असून, राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पोलिस तपास सुरू असून, पुढील चौकशीदरम्यान अनेक नवे तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.














