बुलढाणा (हॅलो बुलडाणा/जितेंद्र कायस्थ) चार वर्षांपासून थंड बस्त्यात गेलेल्या नगरपालिका निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला आहे. गेल्या चार वर्षांत नगरसेवकच नसल्याने प्रशासनाने आपल्या मनाने कामकाज हाकले, आणि जनतेचा आवाज दाबला गेला. आता पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी निवडण्याची सुवर्णसंधी समोर आहे.पण या वेळी सूज्ञ मतदारांनी जागरूक होणे अत्यावश्यक आहे.
बुलढाणा शहराचा चेहरामोहरा बदलत असताना, विकासाच्या नावाखाली अनेक अकार्यक्षम लोकप्रतिनिधींनी केवळ स्वतःच्या तुंबड्या भरल्या. रस्ते, पाणी, स्वच्छता, पार्किंग यासारखे मूलभूत प्रश्न अद्यापही तस्सेच! कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून, एकेकाळी सुंदर आणि स्वच्छ असलेले बुलढाणा आज घाणीच्या विळख्यात सापडले आहे.गेल्या चार वर्षांत काही मोजकेच सुजाण नागरिक जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहिले, तर अनेक माजी नगरसेवकांनी “निवडणुका नाहीत, मग काम कशाला?” अशी भूमिका घेतली. आता अशा निष्क्रिय चेहऱ्यांना पुन्हा संधी देणे म्हणजे शहराच्या भवितव्याशी विश्वासघात ठरेल.
या निवडणुकीत मत देताना उमेदवाराचे शिक्षण, चारित्र्य, जनतेशी असलेली नाळ आणि शहराविषयीचे प्रेम याचा नीट विचार करा. नव्या, कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि जनतेच्या वेदना जाणणाऱ्या उमेदवारांना संधी द्या. बुलढाणा शहर पुन्हा एकदा स्वच्छ, सुशोभित आणि प्रगत बनवायचे असेल, तर आता निर्णय घ्या. अन्यथा पुढची पाच वर्षे पुन्हा पश्चात्ताप करावा लागेल!














