सिंदखेडराजा (हॅलो बुलडाणा) तालुक्यात राजकारणाचे तापमान चढले असून, डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यासाठी हा धक्का कमी गंभीर नाही. त्यांच्या अगदी जवळचे, नगराध्यक्षपदासाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जाणारे श्याम मेहेत्रे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला रामराम ठोकत थेट अजित पवार गटाची वाट धरली आहे. कार्यकर्त्यांतुन उमटणारी नाराजी आणि नेतृत्वावरचा संशय आता स्पष्टपणे शिंगणे गटाला हादरवू लागला आहे.
विधानसभा निवडणुकीतच मतदारांनी स्पष्ट संदेश दिला.सत्ता कुणाच्या घरची नाही! मनोज कायंदे यांनी सुरुवातीला तिसऱ्या क्रमांकावरून झेप घेत विजय मिळवत शिंगणे यांना नामुष्कीजनक पराभव चाखवला.या विजयामागे राष्ट्रवादी (अजितदादा) गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांची रणनीती ठळकपणे दिसून आली.याच दरम्यान, शिंगणे गटातील प्रमुख चेहरे हळूहळू हातातून निसटू लागले हे अधिक चिंताजनक आहे.
आज श्याम मेहेत्रेंच्या या निर्णयाने प्रश्न उपस्थित झाला.शिंगणे साहेब, कार्यकर्त्यांचा विश्वास का ढळतोय? मतदारसंघातील लोकप्रतिनिधींपासून साध्या कार्यकर्त्यांपर्यंत असंतोषाचे वारे वाहताना दिसतात.गटबाजी, निर्णयांतील ढवळाढवळ आणि नेतृत्वातील निष्क्रियता ही कारणं सांगितली जात आहेत.येणाऱ्या नगर परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत ही गळती अशीच सुरू राहिली, तर राजेंद्र शिंगणेंच्या गटासमोर राजकीय अस्तित्व टिकविण्याचं आव्हान निर्माण होईल, यात शंका नाही. कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवला नाही, तर भावी ‘अध्यक्षपद’ तर दूरच, गडही हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.














