चिखली (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) कायदा-सुव्यवस्थेवर सातत्याने होणाऱ्या चर्चा आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने धडाकेबाज पाऊल उचलले आहे. ठाणेदार संग्राम पाटील यांची चिखलीहून बदली करून त्यांना थेट बुलढाणा सायबर पोलिस स्टेशनमध्ये पाठविण्यात आले असून, त्यांच्या जागी नवे ठाणेदार भूषण गावंडे आज पदभार स्वीकारणार आहेत.
संग्राम पाटील यांच्या कार्यकाळात चिखलीत गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसला होता. अवैध धंदे, दहशत माजवणारे गुंड, तसेच वाढत्या चोरी आणि मारामारीच्या घटना त्यांनी कठोर पावले उचलून रोखल्या. स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची कडक कार्यशैली आणि जलद कारवाईसाठी मोठी दहशत होती. तरीही त्यांच्या अचानक बदलीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.आता नव्या ठाणेदार भूषण गावंडे यांच्यावर नागरिकांच्या सुरक्षेची मोठी जबाबदारी आहे. संग्राम पाटील यांनी उभारलेला शिस्तबद्ध पोलिस कारभार पुढे नेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. चिखलीत गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढणार की गावंडे त्यावर अधिक कठोर कारवाई करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














