बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाणा पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांच्यावर तब्बल 4.5 कोटी किंमतीची 14 एकर शेती बेकायदेशीररीत्या हडपल्याचा धक्कादायक आरोप पुढे आला आहे. बुलढाण्यातील तारे कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केले असून या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राहुल तारे यांच्या नावावरची 28 एकर वडिलोपार्जित सामायिक शेती डोंगरखंडाळा येथे असून तिचे 23 पेक्षा अधिक वारसदार आहेत. मात्र त्यातील केवळ आठ वारसदारांनी गुपचूप 14 एकर शेती साडेचार कोटी रुपयांना छत्रपती संभाजीनगर येथील महेंद्र राऊत यांना विकल्याचा आरोप करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे हा महेंद्र राऊत हे ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांचे मावस भाऊ असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्यवहार करताना उर्वरित वारसदारांची संमती न घेता, दुय्यम निबंधक यांच्या मदतीने हा व्यवहार पार पाडल्याचा आरोप तारे कुटुंबाने केला आहे.
तसेच तत्कालीन भ्रष्ट मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी हरकती असूनही या जमिनीची नोंद महेंद्र राऊत यांच्या नावावर केल्याचे आरोप आहेत. संपूर्ण कारवाई ही सिद्धार्थ भंडारे यांच्या दबावाखाली झाल्याचा आरोप करत तारे कुटुंबाने संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे.
आजच मंत्री संजय शिरसाट बुलढाण्यात येत असल्याने या प्रकरणाचा तिखटपणा वाढला आहे. “न्याय देणारे मंत्रीच आहेत तर त्यांनी प्रथम त्यांच्या OSD सिद्धार्थ भंडारे यांना पदमुक्त करून निष्पक्ष चौकशी करावी,” अशी भावनिक मागणी तारे परिवाराने केली आहे.
या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून सर्वांचे लक्ष आता मंत्री शिरसाट यांच्या भूमिकेकडे लागले आहे.














