खामगाव (हॅलो बुलडाणा/ महेंद्र मिश्रा) अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली शेगावमध्ये अवैध जुगार अड्ड्यावर धडाकेबाज छापा टाकण्यात आला. आदर्श रिसॉर्ट, खामगाव-शेगाव रोडवरील या प्रकरणात पोलिसांनी थेट अड्ड्यावर प्रवेश करून 61 जुगारींसह तब्बल ₹62 लाख 2 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात ₹17 लाख 52 हजार 320 नगदी, 12 चारचाकी वाहने,5 मोटारसायकली, आणि 52 मोबाईल फोन यांचा समावेश असून या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई 31 ऑक्टोबर रोजी रात्री 11.50 वाजता गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलिसांनी पंचांसह रिसॉर्टमध्ये धाड टाकताच जुगारबाजांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी सुटकेचे कोणतेही मार्ग न देता सर्वांना तत्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणात एकूण 61 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण मोहिमेचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले. कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, सपोनि सचिन पाटील, पोहेकों प्रभंजन जोशी, पोकों शिवशंकर वायाळ आणि त्यांचे पथक सक्रिय होते. पुढील तपासाची सूत्रे पो.उप.नि. संदिप बारींगे यांच्याकडे आहेत.










