चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) चिखली शहरातील गौरक्षणवाडी परिसरातील मुस्लिम कब्रस्तानात गेल्या अनेक वर्षांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले आहे! रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात अंतिमसंस्कार करावे लागतात.हे दृश्य प्रशासनाच्या निष्क्रियतेचा ज्वलंत पुरावा ठरत आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष नईम शब्बीर सौदागर व जिल्हाध्यक्ष शेख अनिस शेख बुढन यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देत जोरदार मागणी केली आहे की, कब्रस्तान परिसरात ट्यूबलर पोल व हायमास्ट लाईट्स तातडीने बसवाव्यात. नागरिकांच्या भावना व श्रद्धेचा प्रश्न असल्याने याकडे हलगर्जीपणा असह्य असल्याचा इशाराही सौदागर यांनी दिला.
सौदागर म्हणाले, अंधारामुळे अंत्यसंस्काराच्या वेळी महिलांना व वृद्धांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. वाहतुकीत गोंधळ उडतो, सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. ही स्थिती लाजिरवाणी आहे. त्यांनी पुढे बौद्ध स्मशानभूमीत लोखंडी शवदानी बसविण्याची मागणीही केली, जेणेकरून बौद्ध बांधवांना अंतिमसंस्काराच्या वेळी गैरसोय होणार नाही.
या निवेदनाची प्रत आमदार श्वेता महाले यांनाही देण्यात आली आहे. नागरिकांनी आशा व्यक्त केली आहे की, नगरपरिषदेने तातडीने कृती करून कब्रस्तानातील अंधार संपवावा.
या वेळी आजम खान, जावेद खान, शेख कलीम, खालिद बागवान, आरिफ खान, अकिब जमीर, निसार कुरेशी यांसह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.




















 

