बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज सकाळी बुलढाण्याच्या रस्त्यांवर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं! पोलीस, विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिक एकत्र पळत होते… पण कोणाचा पाठलाग करण्यासाठी नव्हे, तर एकतेसाठी! सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभर साजऱ्या होत असलेल्या ‘रन फॉर युनिटी’ उपक्रमात बुलढाणा पोलीस विभागाने आज मॅरेथॉनचे आयोजन करून देशभक्तीचा उत्सव रंगवला.
सकाळी सूर्योदयाआधीच बुलढाणा शहर गजबजले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून धावणाऱ्यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भारत माता की जय, एक भारत-श्रेष्ठ भारत च्या घोषणा देत युवक, विद्यार्थी, अधिकारी आणि पोलीस कर्मचारी 5 किलोमीटर अंतर धावत देशाच्या ऐक्याचा संदेश देत होते.
या मॅरेथॉनमध्ये शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कुणी ट्रॅकसूटमध्ये, कुणी शाळेच्या गणवेशात, तर कुणी पोलीस गणवेशात पळत होते.पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच तेज: देशासाठी, एकतेसाठी!
कार्यक्रमाच्या शेवटी अधिकारी आणि नागरिकांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले. बुलढाणा पोलीसांनी ‘रन फॉर युनिटी’च्या माध्यमातून दाखवून दिलं की, पोलिसांचं धावणं केवळ गुन्हेगारांच्या मागे नसतं- ते देशाच्या एकतेसाठीही असतं!




















 

