अंढेरा (हॅलो बुलढाणा) अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गांगलगाव गावात आज महिलांनी अक्षरशः रणांगण उभारले! गावात सुरू असलेल्या अवैध दारुविक्रीमुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. महिलांच्या डोळ्यांत रोष आणि ओठांवर एकच घोषणा ‘दारूबंदी करा, गाव वाचवा!’
गेल्या काही महिन्यांपासून अंढेरा परिसरातील गांगलगावात मोठ्या प्रमाणात अवैध दारुविक्री सुरू आहे. दारुड्यांच्या उच्छादामुळे गावातील शांतता भंगली असून, रोजच गोंधळ, आरडाओरड आणि अश्लील शिवीगाळ सुरू आहे. अनेक महिलांना मारहाण होण्याच्या घटना वाढल्या आहेत, संसार उद्ध्वस्त होत आहेत, तर मुलांच्या संस्कारांवरही घाला पडत आहे.
या सर्व परिस्थितीने संतप्त झालेल्या महिलांनी आज ठिय्या धरून प्रशासनाला इशारा दिला.“दारू विक्री थांबली नाही, तर ग्रामपंचायत बंद पाडू!” आंदोलक महिलांचा आक्रोश असून, आतापर्यंत ना पोलीस अधिकारी, ना संबंधित विभागाचे कोणी अधिकारी, इतकेच काय तर स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा घटनास्थळी आले नाहीत, यावरून ग्रामस्थांचा संताप आणखी भडकला आहे.




















