बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली असून वाहचालकांचे जीव धोक्यात आले आहेत. दरम्यान ‘हॅलो बुलढाणा’ने नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांना यासंदर्भातील उपाय योजनेबाबत विचारले असता, त्यांनी समाधानकारक उत्तर दिले.
बुलढाणा जिल्ह्यातील चौका चौकात मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसतात. या जनावरांना
पकडण्याची मोहीम पालिकेकडून सातत्याने राबवली जात नसल्याने या जनावरांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रस्त्यांवरील या जनावरांमुळे सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला आहे.मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढत असताना त्यांच्या बंदोबस्तासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत नाहीत. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर सातत्याने जनावरांची वर्दळ असते. मात्र, या रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथे अनेकदा वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो. त्यामधून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. याभागात जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असल्यामुळे अनेकदा वाहतूक खोळंबते. मोकाट गाय- बैलच नव्हे तर मोकाट कुत्र्यांनी उपद्रव मांडला आहे. घोड्यांचा देखील त्रास आहे. यावर उपाययोजना म्हणून मुख्याधिकारी म्हणाले की, मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी लवकरच मोहीम हाती घेणार आहोत. याकरिता आजच निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच मोकाट गाय- बैलांना शहरालगतच्या गोरक्षण मध्ये पकडून ठेवण्यात येईल. त्यामुळे मालकांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करावे, असे हॅलो बुलढाणा शी बोलताना मुख्याधिकारी म्हणाले.