बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सपशेल दुर्लक्ष केल्याने युवक मोठ्या संख्येने अवैध हातभट्टी दारूच्या आहारी गेले असून हजारो संसार या व्यसनामुळे उघड्यावर आले आहेत. ग्रामीण भागाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कायमच दुर्लक्ष केल्याने अवैध हातभट्टी दारू गाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यातूनच तरूणांना हातभट्टीचे व्यसन जडल्याने कायदा व सुव्यस्था धोक्यात आल्याचे चित्र आहे.
मध्यंतरी राज्य उत्पादन शुल्क विभागाने रक्तदानाचा उपक्रम राबवून पाठ थोपटून घेतली मात्र कर्तव्यात कमतरता जाणवत आहे. सर्वत्र अवैध दारूचा महापूर वाहत आहे.
मोह, गुळ आणि तुरटी याला एकत्र करून आठ दिवस एका ड्रमामध्ये त्याला सडवतात त्या नंतर सडवलेल्या मोहाला उकळून त्या पासून दारू बनवतात. यामध्ये कोणी जिवघेणे केमिकल टाकून अवैध हातभट्टी दारू गाळतात त्यामुळे पिणाऱ्यांना नशा झटकेपट चढते. या विषारी गावठी दारू मुळे अनेक जण दगावल्याची घटना घडली आहे. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे ग्रामीण भागात व्यसन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे हातभट्टी दारू पेट्रोल पेक्षा जास्त वेगाने आग पकडते.गावगाड्यात हातभट्टी गाळणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे ग्रामीण भागात घराघरात वादविवाद होण्याच्या घटना घडत आहे. दारूच्या व्यसनी गेलेली व्यक्ती हे दारूची तलब भागविण्यासाठी घरातील महिलांना मोलमजुरी साठी पाठवतात आणि मोलमजुरी करून आणलेल्या पैशावर पुरूष दारूचे व्यसन करतात. पैसे न दिल्यास घरातली महिलांना मारहाण देखिल करतात. यातून हजारो संसार उद्ध्वस्त झाल्याच्या घटना घडल्या आहे. कौटुंबिक प्रश्न दारुमुळे निर्माण झालेले आहे. दारूमुळे वर्षाला कितीतरी अपघात होतात. चोरीच्या गुन्ह्याला प्रोत्साहनाचे मुळ कारण कारण दारु आहे. दारूसारख्या जिवघेण्या पदार्थाला राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रोत्साहन का देते?असा सवाल उपस्थित केला जातोय.




















