बुलढाणा/मुंबई (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर आज वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आली असून, त्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील अधिकारी खडबडून जागे झाले आहेत.
राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका अनेक कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची सर्व तयारी पूर्ण केली असून, आजच्या पत्रकार परिषदेत अधिकृत तारखा आणि आराखडा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.राज्यातील राजकीय पक्षांनीही आपल्या प्रचार मोहिमा आणि उमेदवारांच्या चर्चांना वेग दिला आहे. विविध ठिकाणी बैठका, तयारीचे मेळावे आणि रणनीती ठरवण्याची हालचाल सुरु झाली आहे.
सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही या घोषणेची आतुरतेने प्रतीक्षा असून, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा एकदा राजकीय कुरघोडीचा थरार रंगणाणार अशी उत्सुकता राजकीय वर्तुळात दिसून येत आहे.
राज्यातील मतदारांमध्येही निवडणुकीच्या तारखांविषयी उत्सुकता वाढली असून, आजची संध्याकाळ राज्याच्या राजकीय वातावरणात नवचैतन्य आणणारी ठरणार, असे संकेत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत.




















