अंढेरा (हॅलो बुलडाणा/ सय्यद साहिल) मानवीतेलाही काळिमा फासणारी घटना अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे. रुई (जि.वाशिम) येथील रहिवासी आणि पुण्यातील एका खाजगी कंपनीत नोकरी करणारा राहुल चव्हाण या विकृत बापाने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा चिरून निर्दयपणे खून केल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह घरी जात असताना नवरा-बायकोमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात पत्नी माहेरी जाण्यास निघाली, तर रागाच्या भरात राहुलने आपल्या दोन निरपराध मुलींना घेऊन अंढेरा फाटा परिसरातील जंगल गाठले. तिथे त्याने अक्षरशः शुद्ध हरपून दोन्ही जुळ्या मुलींचा गळा चिरून त्यांचा जीव घेतला!
यानंतर, या नराधमाने स्वतः वाशिम पोलीस ठाण्यात जाऊन थेट गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. डीवायएसपी मनिषा कदम, पोलीस निरीक्षक शंकर शक्करगे, अधिकारी संतोष खराडे, जाधव, जारवार, फुसे आदी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
या अमानुष घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरला आहे. एका वादातून दोन कोवळ्या जीवांचा अंत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पित्याच्या हातून मुलींचा खून झाल्याची ही घटना समाजाला हादरवून टाकणारी असून, अशा विकृत मानसिकतेविरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे.




















