बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील सामान्य रुग्णालयाजवळ राहणारे सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी माधव शंकरराव देशपांडे यांच्या घरात मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 21 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 11.30 ते 22 ऑक्टोबरच्या पहाटे 5.30 या वेळेत घडली. लक्ष्मीपूजेच्या दिवशी देवीच्या मुर्तीला अर्पण केलेले सोन्याचे दागिने चोरट्यांनी हातोहात चोरून नेले.
फिर्यादी देशपांडे हे पत्नी सौ. मंजीली आणि बहीण जया यांच्या सह राहतात. पूजेच्या वेळी त्यांनी देवीला अर्पण म्हणून एक सोन्याची पोत मंगळसूत्र (३० ग्रॅम) व एक सोन्याचा पोहेहार (३० ग्रॅम) घातले होते. सकाळी पूजाघरात पाहता दोन्ही दागिने गायब असल्याचे पत्नी मंजीली यांच्या लक्षात आले. तिथे ठेवलेले रोख रकमेचे नोटाही विखुरलेल्या अवस्थेत सापडल्या, तर देवघराची लोखंडी खिडकी उघडी व जाळी बाजूला केलेली होती.
अज्ञात चोरट्याने खिडकीतून हात घालून लोखंडी तार किंवा गजाच्या सहाय्याने ताटातील दागिने खेचून नेल्याचा संशय आहे. या चोरीत एकूण सुमारे सहा तोळे सोन्याचे दागिने, किंमत अंदाजे 1.5 लाख रुपये, असा ऐवज लांबविण्यात आला आहे.या घटनेवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. 954/2025 कलम 331(4), 305(a) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, तपास पोउपनि रवि मोरे यांच्या स्वाधीन आहे.




















